वाघोली, (पुणे) : गुन्हे शाखेच्या कार्यालयात मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करण्यात येणार असल्याच्या बहाण्याने वाघोली (ता. हवेली) येथील एकाची सायबर चोरट्यांनी तब्बल 29 लाख 49 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघोली येथील 33 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा वाघोली परिसरात राहतो. त्याने एक पार्सल पाठवले होते.यावेळी सदर तरुणाच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन केला व तुमचे नाव मनी लॉन्डरिंगमध्ये असल्याने पार्सल कस्टम विभागाकडे अडकले आहे. तसेच त्यात अवैध अमली पदार्थ सापडले असल्याची माहिती दिली.
तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे असे सांगून एक लिंक पाठविली. त्यांनतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे सांगितले. तसेच अटकेची भीती दाखवली.
दरम्यान, तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तक्रारदार यांना 29 लाख 49 हजार रुपये चोरटयांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.