मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा किंवा टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठी येणे गरजेचे असून, नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयावर काही रिक्षा चालक आणि संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष संजय दुबे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या नियमाला विरोध केल्याचे समोर आले आहे. रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, मात्र मराठी बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्हिडीओमध्ये मांडल्याचे सांगितले जाते. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियमाला विरोध करणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. काही जण सोशल मीडियावर मराठी शिकणार नसल्याचे सांगत व्हिडीओ प्रसारित करत आहेत. अशा चालकांवर परिवहन विभाग आणि आरटीओच्या माध्यमातून नियमांनुसार कारवाई करण्याची प्रक्रिया ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन नियमांनुसार मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकाला सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. या कालावधीत चालकाला मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे.
त्यानंतरही चालकाने मराठीचे आवश्यक ज्ञान मिळवले नाही किंवा नियमाचे पालन केले नाही, तर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. विशेष म्हणजे, हा नियम केवळरिक्षा आणि टॅक्सीपुरता मर्यादित नसून ॲपवर आधारित कॅब चालकांनाही लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांशी संवाद साधताना आवश्यक मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे हा या नियमाचा प्रमुख उद्देश आहे.







