ओतूर : जुन्नर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ओतूर येथे ८ वर्षीय मुलाचा मांडवी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सार्थक गोरख शिंदे (वय ८, रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचा नाव आहे. ही घटना मंगळवार २२ ऑक्टोंबर रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओतूर येथील मांडवी नदी केटी बंधारा येथे मंगळवारी सानिका अमोल कोकाटे ही कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी सार्थक हा देखील मावशी बरोबर आला होता. सार्थक यावेळी तिथे असलेल्या मुला सोबत खेळत होता. काही वेळानंतर सायंकाळी सडे पाच वाजण्याच्या दरम्यान सार्थक शिंदे हा दिसत नसल्याने त्याची मावशी सानिका कोकाटे यांनी शोधा शोध केली असता सार्थक कुठे आढळून आला नाही.
त्यानंतर बेपत्ता झालेल्या सार्थकचा शोध घेण्यासाठी सर्व जण नदी तीरावर आले. त्यावेळी त्याठिकाणी सार्थकची चप्पल आढळून आली. त्यावेळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा त्यांना संशय आला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक यांनी या घटनेची माहिती ओतूर पोलिसांना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी व ग्रामस्थांनी मांडवी नदी प्रवाहात शोध घेतला.
दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २३) सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान नगर कल्याण महामार्गाच्या पुलाच्या खाली मांडवी नदी पात्रात वाहत्या पाण्यात सार्थकचा मृतदेह आढळून आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.