दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारगल्ली परिसरातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 1 किलो 10 ग्राम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 67 वर्षांच्या एका वृद्धाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. 28) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास केली.

आयुब कादर शेख (वय-67, रा. कुंभारगल्ली, विटभट्टीजवळ, दौंड, ता. दौंड, जि. पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन बोराडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 28) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास दौंड पोलिसांना कुंभारगल्लीतील विटभट्टीजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीकडे बेकायदेशीर अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कुंभारगल्ली येथील एका घरी छापा टाकला.
घराची झडती घेतली असता, हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या आणि बिया संलग्न असलेला, उग्र वासाचा सुटता गाठी झालेला कॅनाबिस वनस्पतीचे शेंडे (गांजा) हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याचे वजन केले असता ते 1 हजार 98 ग्रॅम भरले. बाजारात या गांजाची अंदाजे किंमत 20 हजार रुपये आहे.
दरम्यान, अनाधिकाराने आणि बेकायदेशीररीत्या स्वतःच्या ताब्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आरोपी आयुब शेख याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २०(ब), ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत.






