पुणे : पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई चालक पदाची भरती बुधवारी (ता. 19) पोलीस अधीक्षक मुख्यालय मैदान चव्हाणनगर, पुणे येथे घेण्यात आली होती. या भारती प्रक्रियेत ३२० उमेदवार पात्र ठरले आहेत. अशी माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
पोलीस शिपाई चालक पदासाठी शुक्रवारी (ता. 21) मैदानी चाचणीसाठी ६२० उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३६९ उमेदवार हजर राहिले. तर उर्वरित २५१ उमेदवार गैरहजर होते. हजर ३६९ उमेदवारांपैकी ३२० उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत. कागदपत्रे पडताळणीत ३३ व शारीरीक मोजमापात 16 उमेदवार असे ४९ उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मूळ कागदपत्रे आणू नयेत. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति आणाव्यात. परगावातील उमेदवारांना राहण्यासाठी तात्पुरती सोय ही पोलीस मुख्यालयातील पुरंदर हॉल समोरील पेंडॉल व अन्य एक ठिकाणी केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.