पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यामध्ये महायुतीने बाजी मारली असून महाविकास आघडीच्या पदरी पराभव आला आहे. उमेदवारांच्या विजयी मतांची चर्चा सुरु असताना पुणे जिल्ह्यातील नोटाला पडलेल्या मतांची चर्चा सद्या रंगू लागली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामधून ३०३ उमेदवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल आजमावला आहे. मात्र, ४७ हजार ६८५ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले असल्याचे मतमोजणीमध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे, वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या पराभवाची मते ‘नोटा’ला पडलेल्या मतांइतकी असल्याचे बघायला मिळत आहेत.
.पुणे शहरात आठ, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि उर्वरीत ग्रामीण भागात दहा असे एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहूजन समाज पक्ष आणि इतर प्रादेशिक, स्थानिक पक्ष आणि अपक्ष असे ३०३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.
चिंचवड मतदारसंघातून सर्वाधिक २१ उमेदवार..
चिंचवड मतदारसंघामधून सर्वाधिक २१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते, त्याच मतदारसंघात सर्वाधिक चार हजार ३१६ मतदारांनी ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (नोटा) पर्याय निवडला आहेे. त्यानंतर शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक चार हजार २३७ मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे टिंगरे अवघ्या चार हजार ७१० मतांनी पराभूत झाले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर कोथरूड मतदारसंघातून तीन हजार मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. कोथरूडमधून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या मैदानात होते. शिवाजीनगरमधून भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह १२ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. शिवाजीनगर मतदारसंघातून दोन हजार मतदरांनी एकही उमेदवार पसंत नसल्याने ‘नोटा’ला मतदान केले आहे.
‘नोटा’ला झालेले मतदान..
जुन्नर – १३७६, आंबेगाव – ११५७, खेड आळंदी – १६९२, शिरूर – २१५७, दौंड – १२११ इंदापूर – ६३४, बारामती – ७७९, पुरंदर – १४८४, भोर -२७२०, मावळ – २७१५, चिंचवड – ४३१६, पिंपरी – ४०१३, भोसरी – २६८५, वडगाव शेरी – ४२३७, शिवाजीनगर – २०४४, कोथरूड – ३१५२, खडकवासला – २९००, पर्वती – २४६१, हडपसर – २९४६, पुणे कॅन्टोन्मेंट – १७९३, कसबा – १२१३