लोणी काळभोर : देशभरात जागतिक टपाल दिन बुधवारी (ता.९) मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनाही टपाल दिनाचे महत्व समजावे म्हणून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल मधील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर टपाल कार्यालयाला भेट दिली.
पत्रव्यवहार म्हणजे काय? तो कसा चालतो? याचा नागरिकांना काय फायदा होतो. टपाल कार्यालयात काय कामे केली जातात. नागरिकांना कोणकोणत्या सुविधा मिळातात. याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. यावेळी लोणी काळभोरच्या सहाय्यक पोस्ट मास्टर सुनंदा काचेबोईनवाड, पोस्टल सहाय्यक एम आर. शैलेश शर्मा, अनुराग शर्मा, एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या शिक्षिका केतकी केदारी, कल्याणी होळकर, मल्लिका सय्यद, तरविंदरकौर संगारी, परविना, दीपाली मुखर्जी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहाय्यक पोस्ट मास्टर सुनंदा काचेबोईनवाड म्हणाल्या की, नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे ‘मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. माहेरुन ख्याली-खुशाली सांगणारं त्याकाळचं ते १५ पैशांचं पोस्टकार्ड हा जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांजण वाट पाहत बसायचे.
कर्मचाऱ्यांचे कौतुक..
लोणी काळभोर येथील पोस्ट ऑफिसमध्ये डाक जीवन विमा, महिला सन्मान, सुकन्या समृद्धी व विविध प्रकारच्या योजना राबविण्यात अग्रेसर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत खाते उघडणेही चालु आहे. तसेच नागरिकांचे नवीन खाते उघडण्यास देखील भरीव कामगिरी केली आहे. या पोस्टात नेहमी नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. नागरिकांना नेहमी चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून लोणी काळभोर पोस्टमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.