लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई कडून एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर तीन गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून दोन तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिली आहे.
आकाश संतोष भाले (वय 21, लोणी काळभोर, तालुका हवेली) व किरण अण्णा चव्हाण (वय 19,राहणार खोकलाई लोणी काळभोर तालुका हवेली) असे झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. तर मनोज दिलीप मोरे (रा. इंदिरानगर, लोणी काळभोर तालुका हवेली), रोहित रावसाहेब पाटील (राहणार कन्या शाळे जवळ लोणी काळभोर तालुका जिल्हा पुणे) व सुरज अधिक हलवान ( लोणी काळभोर ता. हवेली जिल्हा. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भाले व किरण चव्हाण यांच्यावर घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. वरील पाचही आरोपींवर लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती.
वरील पाचही गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठविला होता.
दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानबद्धच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अट्टल गुन्हेगार आकाश भाले व किरण चव्हाण यांना एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तर गुन्हेगार मनोज मोरे, रोहित पाटील व सुरज हलवान यांच्या तडीपारीच्या प्रस्तावाला पोलीस उपायुक्त आर राजा यांनी मान्यता देऊन आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) क्र. ५५ प्रमाणे जिल्ह्यातून २ वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी वरील २ आरोपींना नागपूर कारागृहात स्थानबद्ध तर ३ आरोपींना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस नाईक तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, संदीप धुमाळ व योगिता भोसुरे यांनी केली आहे.