बारामती, (पुणे) : हरिद्वार येथील अरोमा आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजला बी.ए.एम.एस.ला अॅडमिशन करून देण्याच्या बहाण्याने मागील वर्षी दोघांनी बारामतीतील एका व्यक्तीची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सप्टेबर 2022 ते 27 डिसेंबर 2023 च्या दरम्यान टाटीया इस्टेट, पाटस रोड बारामती येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शकंरलाल शहा (रा. नांदेड सिटी, सिहंगड रोड, पुणे) व प्रितम शंकरराव तिपायले (रा. ग्रेव्हीला मगरपट्टा सिटी, डेस्टीनेशन सेन्टर, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश सदाशिव शिंदे (वय- 49, धंदा शेती) व सिव्हील इंजिनिअर (रा. सम्यक नगर टाटिया इस्टेट पाटस रोड, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. १०) फिर्याद दिली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शिंदे यांची मुलगी ऋतुजा हिचे बी.ए.एम.एस.ला अरोमा आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज पतंजली फेज 2 जवळ हरीव्दार उत्तराखंड येथे अॅडमिशन करून देण्यासाठी बारामती सहकारी बँक शाखा बारामती येथून आर.टी.जी.एस. व गुगल पे व्दारे संजय शहा आणि प्रितम तिपायले यांनी १६ लाख रुपये घेतले होते.
या १६ लाख रुपयांमध्ये केवळ १ लाख रुपये भरून उर्वरित रक्कमेचा अपहार करून मुलीची राहीलेली फि ही भरली नाही. तेव्हा शिंदे यांनी सदरची राहीलेली फि भरा अथवा माझे पैसे मला परत दया, असे वारंवार दोघांकडे विनंती केली. मात्र, दोघांनीही पैसे परत दिले नाहीत. तसेच फी न भरता १५ लाख रुपयांचा अपहार करून फसवणुक करून शिवीगाळ दमदाटी केली.
दरम्यान, याप्रकरणी संजय शहा व प्रितम तिपायले यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.