लोणी काळभोर, ता. २२ : कुंजीरवाडी (ता. हवेली) बाजारतळ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे ४५ वर्षीय वडील हे कुंजीरवाडी येथील शिवशंभो नर्सरीमध्ये मजुरीचे काम करतात. ते कुटुंबासह गुंजाळ मळा परिसरात वास्तव्यास असून मूळचे उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांची मुलगी शोभा (बदललेले नाव, वय १५ वर्षे १ महिना ७ दिवस) ही १६ जून रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास कुंजीरवाडी बाजारतळ परिसरातून अचानक बेपत्ता झाली.

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या अल्पवयाचा फायदा घेत कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावली आणि पालकांच्या संमतीशिवाय तिला घेऊन गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला असून, फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.







