योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे बलिदान मासनिमित्त रविवारी (दि.७) शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान (शिरूर, पुणे) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवन येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत चाकण ब्लड सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानचे पदाधिकारी (कार्यकारणी) व सभासद यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत ७५ शिव, शंभु प्रेमींनी रक्तदान केले होते.
शिबिर संपेपर्यंत १०१ रक्तदात्यांनी शिक्षक भवन येथे रक्तदान केले. यावेळी सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. नव्याने रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण उल्लेखनीय होते.
रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून, या दानात जातपात, धर्म सर्वकाही गळून पडतात आणि माणुसकीचे नाते दृढ होते. म्हणून रक्तदान करूया मानवधर्म वाढवूया, असे अध्यक्ष उमेश धुमाळ यांनी सांगितले. ‘महिला रक्तदात्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना रक्तदानापासून वंचित राहावे लागले. भविष्यात यासाठी प्रतिष्ठानमार्फत उपक्रम हाती घेणार आहोत’, असे उपाध्यक्ष सुशीला बोखारे व सहसचिव अनिता कोकडे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ. संदीप वाव्हळ, चाकण ब्लड सेंटरचे दत्तात्रय पाटोळे, शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड, संतोष पवार, प्रदीप गव्हाणे, सुशीला बोखारे, मंगेश येवले, सुनील पलांडे, लक्ष्मण जाधव, मनोज वाबळे, गोरख काळे, विजय गोडसे, कांतीलाल ओहाळ, मिलिंद आबनावे व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानचे विजया तळोले, सचिन पवार, ॲड. युवराज थोरात, सुधाकर मंचरकर, अनिल पलांडे, रत्नमाला मोरे, हनुमंत भिवरे, रामचंद्र नवले, शितल तावरे, काशिनाथ डफळ, रवींद्र कोहिनकर, प्रकाश नरवडे, शरद दौंडकर, रामदास बत्ते, अनिल शेळके, सुनिल बत्ते, यशवंत रणदिवे ,सिद्धी धुमाळ यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.