सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : शाळा सुटल्यानंतर सायकल खेळणाऱ्या एका १० वर्षीय शाळकरी मुलाला चारचाकी गाडी शिकणाऱ्याने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाला पाहून आईने फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. ही घटना भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली.
समर्थ सुशील शिंदे (वय-१०, रा. भिगवण ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुशील शिंदे हे कुटुंबीयांसोबत भिगवण परिसरात राहण्यास असून ते पेंटरचे काम करतात. त्यांचा मुलगा समर्थ हा भिगवण येथील आदर्श विद्या मंदिर येथील चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याचा नुकताच २४ मे ला वाढदिवस झाला होता. या वाढदिवसाला त्याला सायकल भेट देण्यात आली होती.
रोजच्याप्रमाणे शाळा सुटल्यावर समर्थ हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरापासून जवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सायकल खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान, अत्यंत निष्काळजीपणाने गाडी वळवल्याने समर्थ गाडीच्या चाकाखाली चिरडला.
यावेळी या परिसरात एक चारचाकी गाडी घेऊन शिकण्यासाठी एक व्यक्ती आला होता. मैदानात गाडी चालवत असताना अचानक त्याने गाडी वळवली आणि त्याचवेळी सायकल खेळत असलेला समर्थ गाडीच्या पुढच्या व मागच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समर्थचे निधन झाले.