राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : माणकेश्वर (ता. जुन्नर) येथे कृषी विभागाच्या माध्यमातून गावात पाणी संवर्धन करण्यासाठी वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे जमिनीत पाणी मुरून, भूगर्भातील जलपातळीत वाढ होईल. तसेच गावासाठी हा एक सक्षम जलस्रोत तयार होईल, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. हा बहुधा तात्पुरता असतो. याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो, म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात. याद्वारे पावसाळा संपल्यानंतर, नाला किंवा ओढा यातील पाणी प्रवाह अडवून बिगर पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजवीज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते.
अशा प्रकारच्या बंधाऱ्यांची साखळी करून जमिनीत पाणी मुरवता येते. त्याने पाण्याच्या पातळीत वाढ होते. हा एक सक्षम जलस्रोत आहे. या बांधाऱ्यामुळे गुरे, जनावरे, पशू, पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे तसेच शेतीसाठी उपयुक्त स्त्रोताची सोय होते. हा बंधारा स्थानिक शेतकरी रामचंद्र कोरडे, धर्मा कोरडे, बाळू कोरडे, कोंडीभाऊ बांबळे, एकनाथ मुंढे, दत्तात्रय लांडे, पांडुरंग बांबळे, किसन शेळकंदे, बाळू उतळे, बाळू कोरडे यांनी बांधला आहे. जुन्नर तालुका कृषी कार्यालय, अधिकारी व कर्मचारी तसेच भारती मडके, अमोल भालेकर यांचे यासाठी सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.