पुणे : शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. नवरात्रोत्सवात उत्साह आणि जल्लोषात गरबा, दांडिया खेळला जातो. कित्येक तरुण- तरुणी आवडीने यात सहभागी होतात. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात दांडियाच्या कार्यक्रमात सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळक्याने दहशत माजवत एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील कात्रजजवळील संतोषनगर परिसरातील ही घटना आहे.
अर्जुन दिलीप मोरे (वय 19, रा. विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्ट, मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन मोरे आणि त्याच्या मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात मंगळवारी रात्री दांडीयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी सराइत अमित चोरगे आणि साथीदार त्या कार्यक्रमात आले. संतोषनगर परिसरात अमित चोरगेची काही जणांशी भांडणे झाली होती. त्याच वादातून चोरगे आणि त्याच्या साथीदारांनी दांडिया कार्यक्रमात कोयते उगारून दहशत माजविली. कोयते उगारल्याने दांडीया कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक पळाले. त्यादरम्यान मोरे आणि त्याच्या मामाचा मुलगा तेथून पळताना मोरे खाली पडला. त्यावेळी चोरगे आणि साथीदारांनी रस्त्यात पडलेल्या मोरेवर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. चोरगे आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दहशत माजवून पसार झाले. त्यात मोरे जखमी झाला .
यानंतर फिर्यादीत दिलेल्या तक्रारीनंतर अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पसार झालेल्या चोरगे आणि साथीदारांचा शोध सहायक पोलीस निरीक्षक समीर शेटे करत आहेत.