पुणे : पुण्यातून एक धक्कादाक (Pune Crime) घटना उघडकीस आली आहे. देहूरोड परिसरातील मेंढपाळ महिलेला लाथा-बुक्क्यांनी व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. ‘तुमच्या मेंढ्या इथे मूत्रविसर्जन करतात, त्यामुळे आमच्या म्हशी चारा खात नाहीत…’ या शुल्लक कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचं नाव लक्ष्मण गुरु असं असून, मारहाण झालेल्या महिलेचं नाव अनाबाई राहुल पांडुळे (वय 45) असं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाबाई दरवर्षीप्रमाणे यंदाही देहूरोड येथील दत्त मंदिर परिसरातील लष्करी मैदानात मेंढ्या चारत होत्या. त्यांच्यासोबत इतर काही मेंढपाळही होते. यावेळी आरोपी लक्ष्मण गुरु याने ‘तुमच्या मेंढ्या इथे मूत्रविसर्जन करतात, त्यामुळे आमच्या म्हशी चारा खात नाहीत, या मेंढ्या इथून काढा,’ असा म्हणत महिलेशी वाद घातला. यावर अनाबाई यांनी ‘ही जागा तुमच्या मालकीची आहे का?’ असा प्रतिप्रश्न केल्यानंतर चिडलेल्या लक्ष्मणने अनाबाई यांना काठीने जबर मारहाण करत त्यांचा हात फॅक्चर केला, तसेच लाथा-बुक्क्यांनी देखील मारहाण केली.
या घटनेनंतर अनाबाई यांनी थेट पोलिस स्टेशन गाठलं व तक्रार दाखल केली. अनाबाई यांच्या तक्रारीनंतर देहूरोड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी लक्ष्मण गुरु याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, सध्या अनाबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







