Pune Crime पुणे : किरकोळ वादातून पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना कात्रज पोलिस चौकीतच सोमवारी (ता.१२) मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime) यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तर भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रीतम चुन्नीलाल परदेशी व त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी (दोघे रा. कात्रज गाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितीन तानाजी जाधव (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पांडुरंग माळवे (वय २३, रा. कात्रज) याच्याशी आरोपी प्रितम याची भांडणे झाले होते. प्रितम आणि त्याची आई सुजाता पोलीस चौकीत आले होते. त्यानंतर दोघांनी पोलीस चौकीत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी पोलीस चौकीत आरडाओरडा करु नका, असे त्यांना सांगितले.
दरम्यान, उपनिरीक्षक जाधव बोलल्याचा राग मनात धरून प्रीतम परदेशी याने जाधव यांना ‘तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो, माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तू या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ,’ अशी धमकी देऊन फिर्यादी यांना जोराने ढकलून दिले.
त्यानंतर आरोपीची आई सुजाता हिने पोलीस उपनिरीक्षक जाधव यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. प्रीतम याने त्याच्याकडील फुटलेल्या मोबाईलने उपनिरीक्षक जाधव यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार केले़. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.