पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वातुन एक बातमी समोर आली आहे. येथे नगररस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या आणि चोरीचे गुन्हे असलेल्या एक महिलेला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परीमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिले आहेत. छकुली राहुल कुसळे (वय 24 वर्षे, रा. वाघेश्वरनगर गायरान वस्ती, वाघोली) असे तडीपार करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छकुली कुसळे हिच्याविरुद्ध अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीरपणे गांजा बाळगणे, चोरी करणे तसेच पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तिच्याविरुद्ध दाखल आहेत.
दरम्यान, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, सागर कडू, कमलेश शिंदे यांनी गुन्हेगार छकुली कुसळे हिला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची पडताळणी सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानुसार छकुली सुकळे या महिलेला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे.