पुणे: आयटी कन्सल्टन्ट कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला ऑफिसमधील सहकारी बोलत असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ५५ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १८) पोलिसांत तक्रार दाखल केली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बोट क्लब रोड परिसरात महिला राहत आहे.
अधिक माहितीनुसार, घरी असताना ऑफिसमधील सहकार्याच्या नावे फिर्यादीला मेल आला. मेलमध्ये एक मोबाईल क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले गेले होते. त्यावर फिर्यादीने संपर्क केला असता, ऑफिसमधील काही कामगारांना गिफ्ट व्हाउचर्स द्यायचे आहेत, त्यासाठी अँपल कोड विकत घेऊन पाहिजे आहे, असे सांगितले. ते तू विकत घेऊन मला दे. मी तुला पैसे ट्रान्स्फर करेल असे सांगण्यात आले होते. ऑफिसमधील सहकारी नेहमी अशा स्वरूपाचे काम सांगत असल्याने फिर्यादी महिलेचा विश्वास बसला.
सांगितल्याप्रमाणे महिलेने प्रत्येकी ५ हजार रुपयांचे एकूण १८३ अँपल कोड विकत घेऊन दिले. त्यानंतर सहकाऱ्याशी संवाद झाला असता असे कोणतेही काम मी सांगितले नाही असे त्यांना कळले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.