पुणे: महापालिका येथील पीएमपी (Pune Crime News) बसस्थानकावर सोमवारी सायंकाळी पावणे 5 वाजता थरारक घटना घडली. बसमधून उतरताना मदत करण्याचा बहाणा करून एका चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कट करून चोरी केली. मात्र, महिलेच्या आरडाओरड्यानंतर बस कंडक्टरने धाडस दाखवत पाठलाग करून चोरट्याला पकडले.

या प्रकरणात लखन सुहास जाधव (वय 30, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, त्याचा साथीदार चाँद शेख (रा. मुंढवा) हा पसार झाला आहे. याबाबत रेणु हाडु साहु (वय 56, रा. आनंदनगर, सणसवाडी ता. शिरुर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सणसवाडी येथून बसने मनपा बसस्थानकावर आल्या होत्या. त्या उतरत असताना दोघांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने जवळ केले. त्यापैकी एकाने पिशवी असलेला हात पकडला. यावेळी बसकंडक्टरने विचारले असता, फिर्यादी महिलांनी “माझी पिशवी पकडून ठेवली आहे” असे सांगितले. त्यानंतर तो पिशवी सोडून बसबाहेर पळू लागला. त्याच क्षणी महिलांनी हाताकडे पाहिले असता त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी गायब असल्याचे दिसले. बांगडी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला.
महिलेच्या आवाजानंतर बसकंडक्टरने चोरट्याचा पाठलाग करत डिव्हायडरवरून उडी मारून पळणाऱ्या लखन जाधवला पकडले. त्यानंतर लोकांनी पोलिसांना संपर्क साधला. काही वेळातच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले आणि आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार दीपक रोमाडे करीत आहेत.
दरम्यान, गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने व हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून चोऱ्या करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुंढवा परिसरातील चोरटे सक्रीय असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.







