पुणे: कारेगाव परीसरातील लोकांची फसवणुक करुन पलायन केलेल्या सोनारास परराज्यातुन अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५५ लाख रुपयांचे ९१ तोळे सोन्याचे दागिने रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी जप्त केले आहेत. प्रताप परमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे “महादेव ज्वेलर्स ” नवाने ज्वेलरीचे दुकान होते. ते चालविणारा सोनार प्रताप परमार याने परीसरातील अनेक नागरिकांकडून पैसे घेत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केली. त्यानंतर सदर सोनाराने मोबाईल बंद करुन रातोरात कुटुंब आणि सोन्यासह पलायन केल्याने नागरीक चिंताग्रस्त झाले होते. याबाबत १५० ते १६० नागरिकांचे तक्रारी अर्ज ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाले होते. यामधील बहुतांश तक्रारदार नागरिक हे रांजणगाव एमआयडीसीमधील गोर-गरीब कामगार असल्याने ते आर्थिक अडचणीमुळे प्रताप परमारकडे सोने गहान ठेवत होते.
सदर प्रकरणाबाबत मनिषा रामचंद्र नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनार प्रताप परमार याच्याविरुध्द भा.द.वि.क्र. ४०६, ४२० अन्वये रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकास आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. आरोपी हा त्याच्या कुटुंबासह मुळगावी देखील राहण्यास नसल्याने आणि मोबाईल बंद करुन ठेवल्याने आरेपीचा शोध घेऊन नागरीकांना त्यांचे दागिने परत मिळवून देण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर निर्माण झाले होते.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुहास राकडे, पो. कॉ. उमेश कुतवळ यांच्या पथकाने अहमदाबादच्या कटोसन, ता. कडी, जि. अहमदाबाद येथे जाऊन शोध घेतला. या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एका कपड्याच्या दुकान उद्घाटनाच्या पत्रिकेवर आरोपी प्रताप परमार याचे नाव व मोबाईल नंबर मिळून आला, त्याच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी कपडे खरेदीचा बहाना करत माहिती काढली. कपड्याचे दुकान हे आरोपी प्रताप परमार याचेच असल्याची खात्री झाली. कपडे खरेदी झाल्यानंतर दुकानाच्या शेठला भेटायचे आहे, असे सांगत दुकान मालकाला बोलावुन घेत ताब्यात घेतले.
सदर दुकान मालक हा आरोपी प्रताप परमार ऊर्फ नरपतसिंह मोहब्बतसिंह रजपुत (वय- ४० वर्ष, मुळ रा. चामुंडेरी, ता. जि. पाली, राजस्थान) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला तपास पथकाने ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणल्यानंतर अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नागरिकांकडून घेतलेले दागिने हे कारेगाव येथील ओंकारबाबा ग्रामीण निधी लि. या पतसंस्थेत व काही दागिने हे त्याच्या ज्वेलर्स दुकानाचा जुना भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हाळ (रा. शिंदोडी, ता. शिरुर, जी. पुणे) याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. आत्तापर्यंत एकुण ५४,६०,००० किंमतीचे ९१ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अकिंत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभाग उपविभगीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहा. फौज, दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो. हवा, विलास आंबेकर, संतोष औटी, माणिक काळकुटे, तेजस रासकर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करीत आहेत.