पुणे : पुण्यातील घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणा-या चार वर्षाच्या चिमुकलीवर मानलेल्या मानाने अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आरोपीच्या शोधात होते.
विजय स्वामी बामु (वय 40, रा. घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणा-या चार वर्षाच्या चिमुकलीवर मानलेल्या मानाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पथक हद्दीत गस्तीवर असताना गुन्ह्यातील आरोपी हा मुंढवा रेल्वे पुलाजवळ येणार असल्याची माहिती अंमलदार विक्रांत सासवडकर यांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचून आरोपीला पकडले.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली छबू बेरड, दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाणे, गणेश गोसावी, संदीप येळे यांनी ही कारवाई केली. आरोपीला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.