पुणे : पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराइताला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले आहे. पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील अप्पा बळवंत चौकात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी जयेश ढावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढावरे याच्याविरुद्ध एकाला मारहाण करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केला होता. तसेच या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. ढावरे हा सराइत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. मकोका कारवाई केल्यानंतर तो येरवडा कारागृहात होता.
न्यायालायाकडून त्याला अटी आणि शर्तींवर नुकताच जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर तो तळजाई वसाहत परिसरात वास्तव्यास आला होता. त्याने तिथेही तळजाई वसाहत भागात एकाला मारहाण केली होती. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
ढावरेला रविवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ढावरेला बेड्या घालण्यात आल्या होत्या. त्याला फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत ठेवण्यात येणार होते. न्यायालयातून ढावरेला सायंकाळी पोलिसांच्या गाडीतून फरासखाना पोलीस ठाण्याच्या कोठडीत अंत असताना अप्पा बळवंत चौकात गाडीचा वेग कमी झाला. त्या वेळी गाडीचा दरवाजा ढकलून तो बेडीसह पळाला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. गाडीत असलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले, असे पोलीस निरीक्षक घोडके यांनी सांगितले. ढावरे याच्याविरुद्ध पसार होण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.