पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुणे महापालिकेसमोरील मेट्रो रेल्वे पुलाखाली आईबरोबर 10 वर्षाची मुलगी झोपली होती. झोपलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याघटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
अनिलकुमार उपाराम राठोड (वय 20, रा. काळेवाडी फाटा, कैलासनगर, थेरगाव) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजता घडली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षाच्या मुलीसोबत तिची आई पुणे महापालिका कार्यालयासमोर मेट्रो रेल्वे पुलाखाली झोपल्या होत्या. शनिवारी पहाटेच्या वेळी आरोपी अनिलकुमार राठोड तेथे आला. आईसोबत झोपलेल्या मुलीशेजारी झोपून त्याने तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात आल्यावर तेथील लोकांनी आरोपी अनिलकुमार राठोड यास पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.