(Pune Crime News )पुणे : नायगाव येथील एका तरुणाने अल्पवयीन मैत्रिणीशी लगट करून कात्रज बसस्टॉपवर कीस घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच लग्न न केल्यास तर जीव देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवार (ता.२८ फेब्रुवारी) ते शनिवार (ता.११) यादरम्यान (Pune Crime News) घडला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
शुभम गंगाधर शेडगे (वय २२, रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ नायगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका १७ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आरोपी शुभम शेडगे हे दोघे एकमेकांचे ओळखीचे असून त्या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही कात्रज बसस्टॉपजवळ थांबली असताना, आरोपी शुभम तेथे आला आणि आरोपीने फिर्यादी यांच्याशी शारीरिक लगट करुन त्यांना कीस करुन लज्जास्पद वर्तन केले.
दरम्यान, फिर्यादी अल्पवयीन मुलीने आरोपीला विरोध केला असता, आरोपीने ‘माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देईल आणि तुझे पण नीट नाही होऊ देणार’ अशी धमकी दिली व फिर्यादीचा घरापर्यंत पाठलाग केला. तसेच फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करुन धमकी दिली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी शुभम शेडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तावडे करीत आहेत.