पुणे : दहावीची परीक्षा देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्याला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. वर्गात झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारण्यात आला. यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका विद्यार्थ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थी आणि त्याचा मित्र दहावीची परीक्षा देऊन दोन दिवसांपूर्वी आंबेगाव बुद्रुक स्मशानभूमी परिसरातील पीएमपी बस थांब्यावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी चौघेजण तेथे आले. वर्गात झालेल्या भांडणातून त्यांनी विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. चौघांनी मिळून त्यांना मारहाण केली.
दरम्यान, या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारण्यात आल्याने तो जखमी झाला. जखमी विद्यार्थ्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार वाय. आर. खोडे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.