पुणे : जुन्या वादाच्या कारणावरुन एका तरुणाला शिवीगाळ आणि दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या ईस्माईल मैनुद्दीन शेरीकर व त्याच्या तीन साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईनंतर टोळी प्रमुख ईस्माईल शेरीकर हा फरार झाला होता. अखेर त्याला येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने येरवडा परिसरातून 9 मार्च रोजी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात टोळी प्रमुख ईस्माईल मैनुद्दीन शेरीकर (रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकी समोर, येरवडा) याच्यासह चार जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेरीकर फरार झाला होता. त्याचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, बीट मार्शल अंमलदार नटराज सुतार व काशिनाथ गद्दे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार शेरीकर येरवडा परिसरात येणार आहे.
या माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपीचा शोध घेतला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, विठ्ठल घुले, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांच्या पथकाने केली.