पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून भावाला मारहाण का केली अशी विचारणा करून तूझा माजच उतरवतो, असे म्हणून चौघांनी रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोहियानगरमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर शनिवारी (ता. १४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
अजय रामप्पा बॅगरी (वय २१), शैलेश ऊर्फ साहील रामप्पा बॅगरी (वय २१), अनिकेत व्यंकटेश कोळी (वय २१) आणि भरत व्यंकटेश कोळी (वय १८, सर्व रा. लोहियानगर) अशी मारहाण केलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. अजय, शैलेश आणि भरत हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत प्रेम अनिल पाटोळे (वय २६, रा. पिंपळमाळा, कासेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम पाटोळे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत. शनिवारी रात्री ते अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर असताना अनिकेत कोळी याने फिर्यादीला तू माझा भाऊ भरत कोळी याला मारहाण का केली अशी विचारणा करुन शिवीगाळ केली. तेव्हा फिर्यादीने शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर त्यांनी तुला जास्त माज आला का, आज तुझा माजच उतरवतो, असे बोलून कोयता बाहेर काढून फिर्यादीच्या डोक्यावर वार केला.
दरम्यान, प्रेम पाटोळे यांनी डावा हात आडवा धरला. तो वार फिर्यादीच्या हाताचे बोटावर, दंडावर बसला. अनिकेत याने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर कोयत्याने मारहाण केली. फिर्यादी तेथून पळून जाऊ लागले, तेव्हा शैलेश व भरत याने लाकडी बांबुने त्यांना मारहाण केली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करीत आहेत.