पुणे : पुणे गुन्हे शाखेनी केशवनगर, मुंढवा भागात मोठी कारवाई केली आहे. बनावट व रासायनिक ताडी बनवण्याचे क्लोरल हायड्रेट रसायन गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने जप्त केली आहे. या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 24 मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार युवराज तुकाराम कांबळे (वय-33) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय-61 रा. श्रीरंग निवास, केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे. तर आरोपीला रसायन विक्री करणारा निलेश विलास बांगर (रा. कुरकुटे वस्ती, पिंपळगाव ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रल्हाद भंडारी याने आपल्या कब्जात 5 नायलॉन पोत्यामध्ये रासायनिक ताडी बनवण्याचे रसायनचा साठा करुन ठेवल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला असता घरामध्ये ताडी बनविण्याचे 142 किलो 750 ग्रॅम क्लोरल हायड्रेट आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी 2 लाख 95 हजार 500 रुपयांचे रसायन जप्त केले. त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता रसायन निलेश बांगर याने दिल्याचे त्याने सांगितले. पुढील तपास समाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे करत आहेत.