पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात सोमवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये विश्रांतवाडी येथील गोदामातून 55 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. त्यानंतर दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील अर्थकेम या केमीकल कंपनीवर छापा टाकून 600 किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉन जप्त केले. याच दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीमध्ये छापेमारी करत 400 किलो एमडी जप्त केले आहे. पोलिसांनी आतापर्य़ंत 2200 कोटी रुपये किमतीचे 1100 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे फक्त देशातच नसून इतर देशात देखील पोहोचलेले आहे याचा सखोल तपास सुरू आहे मात्र शिक्षणाच्या माहेर घरात एवढे किमतीचे ड्रग्स कोण आणतयं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होऊ लागला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कंपनीत छापा टाकून 600 किलोपेक्षा जास्त एमडी जप्त केले. या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य 1 हजार 440 कोटी रुपये आहे. ही व्याप्ती आणखी वाढणार असून दोन हजार कोटींच्या घरात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या कंपनीमध्ये 1800 किलो ‘एमडी’च्या निर्मितीचे टार्गेट ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले सॅम व ब्राऊ नावाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके दिल्लीला रवाना करण्यात आली होती. तर काही पथके मुंबईला रवाना करण्यात आली आहेत. या दरम्यान, डोंबिवलीमधून एका ‘केमिकल एक्स्पर्ट’ला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणात मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी आहेत. तसेच देशातील ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालविणारे ‘टॉप’चे तस्कर यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जप्त केलेल्या ‘एमडी’पैकी हे सर्वात ‘सुपर फाईन क्वालिटी’चे ‘एमडी’ असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुरकुंभ येथे तयार झालेले हे ‘एमडी’ मुंबई, मीरा भाईंदर, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि नेपाळ मार्गे विदेशात जाणार होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
पुणे आणि जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना दिल्ली कनेक्शन समोर आले आहे. त्यानुसार पुणे गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने दिल्लीत छापे टाकून 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 1100 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य 2200 कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणात आणखी ड्रग्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि सुनिल तांबे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
नेमकं हे एमडी ड्रग्स आहे तरी काय?
महाराष्ट्रासह देशात शाळकरी आणि कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये ‘म्यॅव म्यॅव’ आणि ‘एम-कॅट’ अशा कोड भाषेत प्रसिद्ध असलेले ड्रग्स म्हणजे एमडी यालाच मेफेड्रॉन असं म्हणतात. हे अमली पदार्थांचे सेवन खासकरून युवा वर्गात असलेले तरुण तरुणी करताना आढळून आलेले आहेत. अवघे एक चिमूट एमडी तुमच्या शरीरात घेतलं तर तुम्हाला नशेची झिंग चढते. अशा अमली पदार्थावर सरकारने बंदी घातली असून त्याचे सेवन आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात केली गेली आहे.
पुण्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील एकमेव नव्हता आणि पुढे देखील नसेल हे पोलीसांच्या या कारवाईतून समोर आले आहे. सध्याचे वास्तव जर बदलायचे असेल तर पोलिसांबरोबर तरुणांच्या पालकांनी देखील त्यांची जबाबदारी उचलून मुले लहान वयात असतानाच अमली पदार्थांचा धोका समजून सांगायला हवा आहे. त्याचबरोबर औषध कंपन्यांच्या नावाखाली काय चालत याची तपासण्यात काम राज्यातील औद्योगिक विभागाने देखील पार पाडायला हवी. तरच तरुण पिढीला ड्रगच्या विळख्यातून बाहेर काढत आपण वाचवू शकणार आहोत.