Pune Crime पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाचा भरदिवसा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश शिवाजीनगर येथील सेशन कोर्टाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी दिले आहेत.
जनार्दन शंकर आडसुळ (वय-२७, रा. म्हसोबा मंदिर जवळ कासेवाडी, पुणे ) अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रोशन (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी किरण गुलाब मोहीते (वय-३५, धंदा, हमाली रा. ५४ एच.पी./१५३, लोहीयानगर, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी मोहीते आणि मृतक रोशन हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपी आडसुळ हा रोशन यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. तेव्हा रोशन याने पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याचा राग मनात धरून आरोपी आडसुळ याने रोशन यांच्या डोक्यात मारहाण केली. हि घटना सोनवणे हॉस्पीटल समोरील सेवनलव चौकाकडून रामोशीगेटकडे जाणाऱ्या नेहरू रस्त्यावर २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास घडली.
दरम्यान, जखमी झालेल्या रोशनला उपचारासाठी पुण्यातील ससुण रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तसेच शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्युचे कारण ‘Death due to head injury’ असे सांगितले.
तर दुसरीकडे आरोपी आडसुळ याने खुन लपविण्यासाठी कटरने स्वतःच्या गालावर व गळ्यावर वार करून स्वतःही जखमी झाला. तसेच रोशनला दुस-याने मारले आहे अशी खोटी माहिती देवून पोलीसांची दिशाभूल केली. मात्र याप्रकरणी किरण मोहीते यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी आडसुळ याला अटक केली.
सदर गुन्ह्याचा खटला शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात न्यायालयाने तब्बल 11 साक्षीदार तपासले. तर सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश जिल्हा न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी यांनी दिले आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांना खडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि. डी. केसकर, सहाय्यक फौजदार धिमधिमे, पोलीस नाईक डोंगर व पोलीस हवालदार संतोष शिंदे यांची मदत मिळाली.