Pune Crime | पिंपरी : पार्ट टाईम नोकरी देतो, असे सांगत वेगवेगळ्या लिंक पाठवून त्या लाइक करायला सांगून एका तरुणीची तब्बल २१ लाख ९५ हजार २० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत संबंधित अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाइल धारक, आलियाना फ्रॉम ग्लोबल चॅट कंपनीवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.२२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाकड येथे घडला.
युट्युबवर व्हिडीओ लाईक करणे पडले महागात…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आयटी कंपनीत संगणक अभियंता आहेत. तरुणीला अनोळखी मोबाईल क्रमांक, चॅट कंपनीकडून संपर्क साधण्यात आला. ‘पार्ट जॉब’देतो असे सांगण्यात आले. युट्युबवर व्हिडीओ लाईक केल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील असे सांगितले.
तरुणीला वेगवेगळ्या लिंक शेअर केल्या. त्या त्यांनी लाईक केल्या. त्यावेळी त्यांच्या खात्यात एक हजार ५०० रुपये जमा झाले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी काही टास्क आहेत. ते तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात टास्कप्रमाणे पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने टास्क पूर्ण केल्या.
त्यानंतर आरोपींनी आणखी टास्क पूर्ण करावे लागतील. तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे खोटे सांगून फिर्यादीची २१ लाख ९५ हजार २० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!