पुणे : विमाननगर येथील बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या कार्यालयात ‘कोरोना कवच’ व इतर आरोग्य विमा पॉलिसीच्या धारकांच्या क्लेमसाठी प्राप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन विमा कंपनीची सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मार्च 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तत्कालीन चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
एक्झिकेटीव रोहन सुभाष गलांडे (रा. वडगाव शेरी, गावठाण, पुणे), मधूकर हनुमंत कांबळे (रा. संजयपार्क, न्यु एअरपोर्ट रोड, पुणे), सिनीअर एक्झिकेटीव्ह विजय थॉमस (रा. पालथरा हाऊस, कोटट्याम, केरळ), ऑफिस बॉय शुभम संतोष शेवाळे (रा. मु.पो. लांडेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे) यांच्यावर आयपीसी 408, 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिजीत शशीकांत मोरे (वय-39 रा. काळे बोराटे नगर, हडपसर, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विमाननगर येथील बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीत कामाला होते. कोरोनावरील उपचारासाठी सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘कोरोना कवच’ ही पॉलिसी उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक पॉलिसी धारकांनी रिम्बर्समेंट क्लेमही केले होते.
यावेळी आरोपींनी एकमेकांमध्ये संगणमत करुन ‘कोरोना कवच’ व इतर आरोग्यविमा पॉलीसी धारकांची रिम्बर्समेंट क्लेमसाठी प्राप्त झालेल्या क्लेम प्रस्तावासोबतच्या वैद्यकीय कागदपत्रांमध्ये फेरफार केला आहे.
या प्रकरणातील आरोपींनी कोविड-19 चे उपचार न घेतलेल्या त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या लोकांचे उपचार घेतल्याचे बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे कोरोना कवच व इतर आरोग्यविमा पॉलिसीच्या रिम्बर्समेंट क्लेमचे 97 प्रस्ताव पाठवून ते मंजूर करुन घेतले होते.
आरोपींनी यावेळी मंजूर झालेले पैसे त्यांच्या नातेवाईक, मित्र, ओळखीच्या लोकांच्या बँक खात्यावर पाठवून नंतर ते पैसे एकत्र करुन सगळ्यांमध्ये वाटून घेतले. आरोपींनी कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर फिर्यादी यांनी बुधवारी (दि.5) पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.