पुणे : पुणे शहरात थंडी कायम असून पारा घसरलेलाच आहे. गुरुवारी १८ जानेवारीला शहरात किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस इतके होते. तर, शहर परिसरात नीचांकी तापमान पाषाण येथे १०.९ अंश सेल्सिअसवर होते.
दरम्यान, पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून, थंडीचा पारा ९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या शहराच्या दिशेने उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. तसेच आकाश निरभ्र झाल्यामुळे हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे थंड वाऱ्यांचा प्रभाव शहराच्या किमान तापमानावर झाला आहे. त्यामुळे थंडीचा पारा उतरलेला आहे.
शहरातील काही भागात किमान तापमानात घट
- एनडीए १२.२
- कोरेगाव पार्क १६.४
- मगरपट्टा १६.९
- वडगावशेरी १७.१ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
सकाळी शहर परिसरावर धुकेही पाहायला मिळत आहे. येत्या १९ ते २४ जानेवारीदरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, सकाळी धुकेही पडणार आहे. या दरम्यान किमान तापमान ९ ते १२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहणार आहे.
या राज्यात थंडीच्या लाट
उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी होत असून, गुरुवारी १८ जानेवारीला पंजाबच्या लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, राजस्थान उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार राज्यात थंडीची लाट आणि थंड दिवस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.