पुणे : जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये भाजप नगरसेवकाच्या कार्यालयात घुसून चार ते पाच तरुणांनी त्यांच्यावर बेछुट गोळ्या झाडून निर्घुण हत्या केली होती. यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पाच आरोपी सिनेस्टाईल एका कारमध्ये आले होते.
पाचही जण हातात पिस्तूल घेऊन गाडीच्या खाली उतरून माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्या कार्यालयात शिरले. तेव्हा कार्यलयात बाळू मोरे हे एकटेच होते. त्यांनी मोरे यांच्यावर बेछूट गोळीबार करून पळून गेले. संबंधित घटनेमुळे जळगाव सह राज्यात एकच खळबळ उडाली होती. अखेर या हत्येचं पुणे कनेक्शन उघडकीस आलं आहे. जळगाव पोलिसांनी या हत्येप्रकरणी पुण्यातील २ आरोपींना अटक केली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्या खुनातील दोन आरोपींना पोलिसांनी पुण्याच्या लोणीकंद परिसरातून अटक केली आहे. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून सचिन सोमनाथ गायकवाड आणि अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
जळगावच्या चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ अशा एकूण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सर्व आरोपी हल्ल्यानंतर फरार होते. दरम्यान, दोन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातील लोणीकंद परिसरातून अटक केली आहे.
सचिन सोमनाथ गायकवाड (वय २३, रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि.जळगाव) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख (वय २३, रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यातघेतलं असून दोघांना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.