पुणे : पावसाने उघडीप दिली असली तरी पुणे शहर आणि उपनगरात सध्या डेंग्यूचे पेशंट मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातच महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेंग्यूसदृश लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आयुक्तांच्या डेंग्यूच्या केलेल्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज डी. पी. यांच्याकडे सध्या आयुक्तांचा पदभार सोपवण्यात आला आहे. दोन ते तीन दिवसांच्या उपचारानंतर आयुक्त रुजू होतील, असे पालिकेच्या सूत्रांनी कळवले आहे.
शहरात डेंग्यूच्या रुग्णाची संख्या वाढत असताना पुणे महापालिकेचे प्रमुख डॉ. भोसले यांनाच आता लक्षणे आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापालिका आयुक्तांना डेंग्यूची लक्षणे आढळून आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागकडून आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.