पुणे : उजनी जलाशयात बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली आणि यात सहा जणांचा बळी गेल्याच्या घटनेनं अनेक प्रश्न समोर आले. धरणांच्या जलाशयातून बोटीने प्रवास करताना होणा-या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता नियमावली तयार करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने केला आहे.
पुढील काही दिवसांमध्ये ही नियमावली तयार करुन तिची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.
ही नियमावली तयार केल्यानंतर बोट आणि बोट मालक, चालक यांची संपूर्ण माहिती तहसीलदार आणि तेथील पोलीस प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. यामुळे भविष्यकाळात असे अपघात रोखले जातील. तसेच बोटी चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येईल. अशी नियमावली तयार केल्याने असे अपघात टाळता येतील असे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.