पुणे : परिसरात आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश मंगलदास गायकवाड (वय ३२, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.

ही घटना १४ जून रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील पंचशीलनगर परिसरातील दयावान समाजासमोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश गायकवाड आणि त्यांचे मित्र परिसरात उभे होते. त्यावेळी शोएब कुरेशी आणि त्याचे साथीदार मोठ्याने आरडाओरडा करत होते. गायकवाड यांनी त्यांना आरडाओरडा का करत आहात, असा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी गायकवाड आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी उमेश गायकवाड यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले होते.
प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी तपास सुरू करून शोएब कुरेशी याला अटक केली. फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक विशाल माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.







