पुणे : बहिणीला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या एका तरुणावर गुंडांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना औंध परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका सराईत गुंडासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतरही संबंधित टोळक्याकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी सतीश शहाजी पवार (वय ४०, रा. इंदिरा वसाहत, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार दादू मिसाळ (वय २३, रा. इंदिरा वसाहत, औंध) आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता सतीश पवार हे साकळनगर गेटसमोर काम करत होते. त्यावेळी त्यांना ओंकार मिसाळ आणि त्याचे साथीदार दिसले. दुपारी त्यांच्या बहिणीला मारहाण केल्याबाबत त्यांनी ओंकारला जाब विचारला. याचा राग आल्याने ओंकारने “तू कोण मला विचारणारा?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर वाद वाढत गेला आणि ओंकार मिसाळ याने हातातील दगडाने सतीश पवार यांच्या डोक्यावर वार केला. तसेच त्याच्या साथीदारांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात सतीश पवार जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. मात्र, परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित टोळक्याची दहशत अद्याप कायम असून त्यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकार केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून संबंधित टोळक्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.







