पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून सध्या २३.३७ टीएमसी म्हणजेच ८०.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी २८.४० टीएमसी (९७.४१ टक्के) पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदा तब्बल ५.०३ टीएमसीने साठा कमी झाला आहे. या घटीमुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंगळवारी (३ नोव्हेंबर २०२६) सकाळी सहा वाजताच्या अहवालानुसार, चारही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता २९.१५ टीएमसी असून, सध्या २३.३७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यंदा धरण परिसरात पावसाचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेत कमी राहिले आहे.
खडकवासला धरणात १.१३ टीएमसी (५७.४७ टक्के), वरसगावमध्ये १०.९२ टीएमसी (८५.१९ टक्के), पानशेतमध्ये ८.२० टीएमसी (७६.९९ टक्के), तर टेमघरमध्ये ३.१२ टीएमसी (८४.२० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. चारही धरणांतील एकत्रित साठा ८०.१९ टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या पवना धरणात सध्या ७.६७ टीएमसी म्हणजेच ९०.२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर मुळशी धरणात १४.६८ टीएमसी (७२.८३ टक्के) पाणी शिल्लक आहे. या दोन्ही धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू नाही.

यंदा खडकवासला परिसरात ७९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत येथे ४९१ मिलिमीटरने कमी पाऊस झाला. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या परिसरातही अनुक्रमे ६१२, ६८२ आणि १,०५५ मिलिमीटरने पावसाचे प्रमाण घटले आहे. कमी पावसाचा परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर दिसून येत आहे.
दरम्यान, वरसगाव आणि पानशेत धरणांतून प्रत्येकी ६०० क्युसेक, तर टेमघर धरणातून २६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून पुणे महापालिकेसाठी ६१८ क्युसेक आणि नवीन मुठा उजव्या कालव्यासाठी १,१०३.५० क्युसेक पाणी घेतले जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आणि पावसातील घट पाहता, आगामी उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणी नियोजनाकडे लक्ष लागले आहे.






