पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन फसवणुकीची घटना समोर आली आहे. येथे शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून एका 45 वर्षीय महिलेला 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वराली दीपक देशपांडे (वय 45, रा. भेलके नगर, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून अन्वी रिझारिओ नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वी रिझारिओ हिचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. तिने या ग्रुपवर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात फिर्यादी यांना अनेक लिंक्स पाठविल्या. त्यानंतर एक ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. स्वराली यांना तिच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करून घेतले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी स्वराली यांना ॲपच्या माध्यमातून शेअर मार्केट मधून नफा मिळवून दिला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना एक बँक खात्याची माहिती पाठविली. या बँक खात्यावर वेळोवेळी 15 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करून घेतले. मात्र, त्यानंतर फिर्यादी स्वराली यांना कोणताही नफा दिला नाही. याबरोबरच मूळ रक्कमही परत केली नाही. हा सर्व प्रकार 4 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान घडला.
आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी स्वराली यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.