पुणे : शहरातील बाणेर भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून महिलेवर पतीकडून चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर पतीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत महिला आणि तिचा पती गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा, नसीमा मुल्ला (वय ३२), चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय ३६, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, बाणेर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला हा टेम्पोचालक आहे. त्याचे पत्नी नसीमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन नेहमी वाद होत होते. नसीमाचे नातेवाईक पुण्यातील बाणेर भागात वास्तव्यास आहेत. नसीमा आणि अमजद दोघेही नातेवाईकांना भेटायला पुण्यात आले होते. बाणेर भागातील एका हाॅटेलमध्ये ते थांबले होते. त्यांनंतर तिथेच दोघांमध्ये भांडणं झाली.
त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले. आणि स्वत:च्या गळ्यावर, व पोटावर धारदार चाकूने वार केले. या वादात दोघेही जण गंभीर जखमी झाले आहेत. बराच आरडा ओरडा झाल्यानंतर जखमी अवस्थेतील मुल्ला दाम्पत्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
प्राथमिक तपासात अमजदने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आलीआहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.