Uruli Kanchan: लोणी काळभोर, ता. 25 : उरुळी कांचन–सोरतापवाडी–शिंदवणे पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, भाजपकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पूजा सणस यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या गणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पंचायत समिती गणातून भाजपकडून सुदर्शन चौधरी व पूजा सणस हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अधिकृत उमेदवारी सुदर्शन चौधरी यांना जाहीर केली. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या पूजा सणस यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उरुळी कांचन परिसरात भाजपमध्ये यापूर्वीच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. उरुळी कांचन जिल्हा परिषद गटासाठी भाजपने सुरुवातीला जीवन शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून शंकर बडेकर यांना तिकीट देण्यात आले. या निर्णयामुळे भाजपमधील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
अशातच आता उरुळी कांचन–सोरतापवाडी–शिंदवणे पंचायत समिती गणात पूजा सणस यांना डावलण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपमधील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील एकसंघतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सध्या भाजपमध्ये फुटीर वातावरण निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, भाजपच्या मतांचे विभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांची लढत न राहता, भाजपच्या अंतर्गत राजकारणाचीही मोठी कसोटी ठरणार असल्याची चर्चा आहे.
पक्षश्रेष्ठी नाराजांची समजूत कशी काढणार?
पूजा सणस व जीवन शिंदे हे दोन्ही नेते उमेदवारी न मिळाल्याने नाराज असून, त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्यास भाजपच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूजा सणस आणि जीवन शिंदे यांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश येते की नाही, यावरच या गटातील व गणातील राजकीय गणिते अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपमधील अंतर्गत मतभेद ठरणार निर्णायक
भाजपमधील अंतर्गत विसंवाद आणि नाराजीचा थेट फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो. आधीच अटीतटीच्या लढती अपेक्षित असताना, भाजपची मते विभागली गेली तर विरोधकांसाठी विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठी वेळीच हस्तक्षेप करून नाराज नेत्यांची समजूत काढतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी पूजा सणस व जीवन शिंदे हे दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत पक्षांतर्गत हालचालींना वेग येणार असून, समेट होतो की संघर्ष अधिक तीव्र होतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.






