पुणे : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुरुळी गावात घडली. ही घटना १२ आणि १३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.

प्रियांका महादेव इगवे (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर महादेव मारुती इगवे (वय ३५, रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. पिसेगाव, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियांका यांचे वडील बंडू आत्माराम धुमाळ (वय ५८, रा. शिवणी, बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि प्रियांका हे दोघेही नोकरी करत होते. त्यांना दहा वर्षांचा मुलगा आहे. प्रियांका यांचे निलेश दिलीप कांबळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा महादेवला संशय होता. यावरून पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वाद झाले होते.

१२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास महादेव, प्रियांका आणि त्यांचा मुलगा झोपले. त्यानंतर मध्यरात्री महादेवने प्रियांकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील फरशीवर पत्नीच्या कथित प्रेमसंबंधाचा उल्लेख करत तिला मारल्याचे लिहिले. पुढे त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
पहाटे चारच्या सुमारास दहा वर्षांच्या मुलाला जाग आली. त्यावेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उठत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना याबाबत सांगितले.
घटनेची माहिती मिळताच दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जायभाये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पिंजारी करत आहेत.







