पुणे : मुंबई-बंगलुरु महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावरुन जाणार्या एकट्या महिलांना हेरुन दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातले दागिने हिसकावून नेणार्या दोन चोरट्यांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केले आहे. अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच अधिक चौकशीत 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आकाश आंबादास आंधळे (वय 24, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे), आणि सुजल नरेश वाल्मिकी (वय 20, रा. दांगट पाटील इस्टेट, शिवणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वारजे माळवाडी भागातील महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर गेल्या साडेतीन महिन्यात तीन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. 7 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास एका 80 वर्षाच्या ज्येष्ठ महिचे दिगंबर वाडी येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ चोरुन नेली होती.
दरम्यान, 27 फेब्रूवारील 72 वर्षाच्या ज्येष्ठ महिला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सोसायटीमधून स्कुटर आणण्यासाठी त्यांचे पती गेले असताना त्यांची वाट पहात बाहेर थांबल्या होत्या. तेंव्हा दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पसार झाला होता.
त्यानंतर 5 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता एका 37 वर्षीय महिला हैद्राबाद बिर्याणी हॉटेल ते राजमुद्रा हॉटेलकडे जाणार्या अंतर्गत सर्व्हिस रोडवरुन शेजारी राहणार्या महिलेबरोबर पायी चालत जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेले होते.
दरम्यान , अश्या घटना वारंवार घडत असल्याने या गुन्ह्यांना प्रभावी पायबंद घालण्यासाठी व हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यांनी मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून व बातमीदारामार्फत माहिती मिळवली. या माहितीच्या विश्लेषणातूनच पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार, यांना हे चोरटे वारजेतील एन डी ए ग्राऊंट येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने त्यांचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 70 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. चौकशीअंती तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.