पुणे: पुण्यात गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. बापट हे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलत असताना एका व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संतोष चव्हाण याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याची माहिती आहे. संतोष चव्हाण हा राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे.

हल्ल्यानंतर संतोष चव्हाणने प्रसारमाध्यमांशी ओझरता संवाद साधला. यावेळी त्याने आक्रमक वक्तव्य केले. “तो टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे. मला काही भूमिका मांडायची नाही. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मी मारणार,” असे चव्हाणने म्हटल्याची माहिती आहे.

या वक्तव्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झाले असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याबाबत पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी माहिती देताना सांगितले की, एका व्यक्तीने बापट यांच्यावर हल्ला केला आहे. या व्यक्तीने बापट यांच्यावर हल्ला का केला आणि कोणत्या हेतूने तो घटनास्थळी आला होता, याचा तपास करण्यात येणार आहे.
बापट यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच संपूर्ण तपासणी केल्यानंतर विद्यानंद बापट यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. “मी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते हे पाहून हल्ला केला,” असे बापट यांनी म्हटले.
या घटनेचे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगत पोलिसांनी ते पाहून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना बापट यांनी संतप्त शब्दांत प्रतिक्रिया दिली.
गणेशोत्सवाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना बापट म्हणाले की, सार्वजनिक पद्धतीने उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. गणेशोत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्यावर सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला करण्यात आल्याचा आरोपही बापट यांनी केला.






