पुणे : शहरातून एक अनोखी घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बाॅयच्या वेशात जाऊन ज्या सोसायटीमधील घरे बंद आहेत. त्यांची रेखी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणाचे धागेदोरे चोरट्यापर्यंत सीमित नसून चोरट्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार मित्र आणि एक सराफ व्यावसायिक देखील यात सामील आहेत. पोलिसांनी या सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत. चोटयाकडून पोलिसांनी १५० हिरे, ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, दुचाकी, दोन पिस्तुलं आणि पाच काडतुसे असा अंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणात आरोपी सुरेश बबन पवार (वय ३५, रा. बालाजीनगर, गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड),आणि सराफ व्यावसायिक अजय करणसिंग राजपूत (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गुन्हेगारचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सोळाशे, सतराशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
स्वारगेट परिसरात गेल्या महिन्यात १९ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाकडून करण्यात येत होता. पोलिसांनी जवळपास सोळाशे, सतराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. तपासात एके ठिकाणी चित्रीकरणामध्ये गणेश काठेवाडे हा अस्पष्ट स्वरूपात दिसला होता. तपास पथकातील पोलीस कर्मचारी रफीक नदाफ, शंकर संपत्ते, सागर केकाण, दिनेश भांदुर्गे यांना स्वारगेट भागतील घरफोडी सराइत चोरटा काठेवाडेने केल्याची माहिती मिळाली दिली आहे.
अधिक माहिती अशी की, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग कोंढवा परिसरातील उंद्री भागातून त्याला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने डिलिव्हरी बाॅयसाखे कपडे परिधान करून शहरातील विविध सोसायटीतील बंद घरांची टेहाळणी करून वेळेनुसार घरफोडी करायचो असे पोलिसांना सांगितले. घरफोडीचे १४ गुन्हे केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
आरोपी पवार हा मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावचा माजी उपसरपंच
आरोपीने स्वारगेट एसटी स्थानकाच्या परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे सात गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. चोरलेले दागिने त्याने सराइत गुन्हेगार सुरेश पवार याच्याकडे दिले होते. पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. या गुन्ह्यात त्याने जामीन मिळवला होता. आरोपीने दिलेले दागिने पवारने सराफ व्यावसायिक भीमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीने विक्री केल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी राजपूतला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी पवार हा मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावचा माजी उपसरपंच आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी पवार याच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त केली आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, संजय भापकर, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, नाना भांदुर्गे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपत्ते, सागर केकाण, सतीश कुंभार, राहुल तांबे, शरद गोरे, विक्रमल सावंत, तसेच पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी ही कामगिरी केली आहे.