पुणे: धुळे येथून ‘एसटी’ने आलेल्या दोन तस्करांकडून 7 लाख रुपयांचा 34 किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. राकेश रुपसिंग पवार (वय 25, रा. शिरपूर, दापचेपाडा, धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 6 लाख 80 हजार रुपयांचा 24 किलो गांजा, दोन मोबाईल संच, ट्रॅव्हलिंग बॅग, हँडबॅग असा एकूण 7 लाख 4 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
याबाबत नितीन राजाराम जगदाळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस हवालदार बोमादंडी, सूर्यवंशी, गायकवाड, चालक पोलीस अंमलदार बास्टेवाड हे 22 एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत वाकडेवाडी येथील आले.
खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे, प्रताप केदारी हे देखील त्यांच्याबरोबर वाकडेवाडी येथील एस टी बसस्थानकाजवळील नॅशनल टुर्स अँड ट्रॅव्हल्स येथे रात्री 8 वाजता थांबले होते. त्यावेळी दोन जण दोन्ही हातामध्ये दोन मोठ्या ट्रॅव्हल बॅग व पाठीवर सॅक बॅग घेऊन जाताना दिसले. त्यावेळी पोलिसांना पाहून ते पळून जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांना पकडून त्यांच्याकडील ट्रॅव्हल बॅगेची तपासणी केली असता दोन्ही बॅगांमध्ये गांजा मिळून आला. 14 किलो आणि 20 किलो असा 34 किलोचा गांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
याबाबत दोघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात एन डी पीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.