पुणे : पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातून एक बातमी समोर आली आहे. तू माझ्या बहिणीला दररोज का छेडतोस, असे म्हणत एका दुचाकीस्वाराला मारहाण करुन गळ्याला चाकू लावून सोनसाखळी आणि अंगठ्या लुटून नेणार्या दोन सराईत गुन्हेगारांना विशेष न्यायालयाने मोक्का अंतर्गत 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येकी 15 लाख 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल विशेष न्यायालयाचे न्यायाधीश (मोक्का) व्ही आर कचरे यांनी दिला आहे.
सूरज ऊर्फ सुबा रवींद्र कांबळे (वय 31 वर्ष, रा. साईबाबा मंदिराजवळ, येरवडा) आणि निलेश संजय सस्ते (वय 23 वर्ष, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी चिंचवड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 2016 मध्ये कोंढवा परिसरात घडली होती. दुचाकीवरुन घरी परतत असताना एका व्यापार्याला आरोपींनी अडविले. त्याला अडवून जबरदस्तीने त्याच्या गळ्यातील सोनसाखळी व अंगठ्या काढून घेतल्याची घटना घडली होती.
कोंढवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सेवानिवृत्त ACP सतिश गोवेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी या दोघांना अटक केली. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. कांबळे आणि सस्ते या दोघांनी यापूर्वी आणखी गुन्हे केले असल्याने त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी केला. या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड. व्ही एम फरगडे आणि अॅड. प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले.
आता या प्रकरणात, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 392 नुसार दोघांनाही सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी दंड न भरल्यास त्यांना प्रत्येकी 1 महिन्याची साधी कैदेची शिक्षा भोगावी लागेल. तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रणकायदा, 1999 च्या कलम 3(1)(2) नुसार प्रत्येकी 5 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंड, मोक्का च्या कलम 3 (2) अंतर्गत प्रत्येकी 5 वर्षे तुरुंगवास आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंड, कलम 3(2) अंतर्गत प्रत्येकी 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आला आहे. आरोपींनी दंड न भरल्यास प्रत्येक शिक्षेसाठी त्यांना 1 महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, कोंढवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर (सेवा निवृत्त) आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी तपास केला. याप्रकरणात सहाय्यक पोलीस फौजदार महेश जगताप यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.