पुणे : दिवाळीच्या सणासाठी गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या विमान प्रवाशांना यंदा तिकिटांसाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. सणासुदीच्या काळात पुण्यातून विविध शहरांकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या अवाजवी दरवाढीमुळे प्रवासी संतप्त झाले असून, सरकारने हस्तक्षेप करून विमान भाड्यांवर मर्यादा घालावी, अशी मागणी केली जात आहे. सणासुदीच्या काळातील वाढत्या मागणीचा फायदा विमान कंपन्या घेत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.

विमान तिकिटांच्या दरवाढीमुळे कुटुंबे, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी विमान प्रवास महागडा ठरत आहे. विशेषतः दिवाळीच्या काळात प्रवासाच्या तारखांमध्ये बदल करणे शक्य नसल्याने प्रवाशांना वाढीव दराने तिकिटे खरेदी करण्याशिवाय पर्याय राहत नाही.
नागपूरच्या मूळ रहिवासी असलेल्या प्रज्ञा काकडे म्हणाल्या, “दिवाळीसाठी संपूर्ण कुटुंबाला नागपूरला घेऊन जायचे होते. मात्र, विमान तिकिटांचे दर काही लोकांच्या महिन्याच्या पगाराइतके झाले आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते, हे आम्हाला मान्य आहे. पण म्हणून विमान भाडे इतके अवाजवी असू शकत नाही. सरकारने हस्तक्षेप करून प्रवाशांचे हित जपले पाहिजे.”

नियमित दिवसांतील आणि दिवाळीच्या काळातील विमान तिकिटांच्या दरांची तुलना केल्यास काही मार्गांवर प्रवाशांना तीन ते सात पट अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे दिसून येते.

पुणे-नागपूर मार्गावर एकेरी प्रवासाचे नियमित भाडे साधारणतः ५,५०० ते ६,५०० रुपये असते. मात्र, दिवाळीच्या काळात हेच भाडे वाढून १९,०६८ ते ४२,६८२ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
पुणे-पाटणा मार्गावर नियमित तिकिटांचे दर साधारणतः ६,००० ते ८,००० रुपये असतात. मात्र, सध्या विनाथांबा विमान प्रवासासाठी सुमारे २४,४३९ रुपये मोजावे लागत आहेत. पुणे-बंगळुरू मार्गावरील भाडेही नेहमीच्या ३,००० ते ५,००० रुपयांवरून वाढून ७,००० ते १०,००० रुपयांपर्यंत गेले आहे.
पुणे-दिल्ली मार्गावर नियमितपणे ५,००० ते ६,००० रुपये असणारे तिकीट आता ९,००० ते १०,००० रुपयांच्या पुढे गेले आहे. पुणे-भोपाळ मार्गावरही मोठी दरवाढ झाली आहे. या मार्गावरील नियमित भाडे ८,००० ते १०,००० रुपये असताना सध्या ते १७,८०० ते २८,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
एकूणच, दिवाळीच्या काळातील विमान तिकिटांच्या वाढत्या दरांमुळे प्रवाशांचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.






