मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. डिस्चार्जनंतर शरद पवार थेट त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेते आणि मान्यवर रुग्णालयात भेट देत होते. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिल्वर ओक येथे जाऊन पवारांची भेट घेणार आहेत.

शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास जाणवत असल्याने सुरुवातीला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे दोन दिवस उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे रुग्णालयात उपस्थित होते. आता शरद पवार सिल्वर ओक येथे विश्रांती घेणार आहेत.

२ नोव्हेंबर रोजी प्रकृती अस्वस्थ झाल्याने शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने वैद्यकीय तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून दिली होती. त्यावेळीही पवारांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

४ नोव्हेंबर रोजी त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याच दिवशी पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबतही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती.
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विश्वजीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे सचिन अहिर तसेच उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोनदा भेटीसाठी वेळ घेतली होती, मात्र त्यांची भेट झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजताची वेळ घेण्यात आली होती, असे वृत्त आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयावर भाष्य केले.
“स्वर्गीय अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या,” असे तटकरे म्हणाले. अजित पवार यांच्या निधनामुळे विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्याचेही त्यांनी नमूद केले. अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी ही सांगितली जाणारी तारीख निश्चित झाली असती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.






